म्हणून मोदींनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला, शरद पवार यांनी सांगितलं कारण
शेतकरी आंदोलनाला मिळालेलं हे मोठं यश असल्याचं मानलं जातंय.
चंद्रपूर : देशात वादग्रस्त ठरलेले तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. देशात कृषी कायद्यांवरून वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू होतं. शेतकरी आंदोलनाला मिळालेलं हे मोठं यश असल्याचं मानलं जातंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याच बरोबर त्यांनी मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे.
निवडणुकीत शेतकरी प्रश्न विचारतील म्हणून मोदींनी हा निर्णय घेतल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आगामी काळात उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पंजाब निवडणूकीत शेतकरी प्रश्न विचारतील यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहे. पण झालं ते उत्तम झालं, संघर्षात शेतकऱ्यांना सलाम अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.
केंद्रातील भाजप सरकारने हे कायदे काही तासात मंजूर केले, आम्ही चर्चेचा हट्ट केला, पण सरकारने ऐकलं नाही, शेती देशाचा आत्मा आहे. कायदे करायचे असतील तर एकत्र बसू, हा राजकीय विषय नाही असंही आम्ही सांगितलं. पण मोदी सरकारने आमचं ऐकलं नाही. सरकारची ही भूमिका अतिरेकी भूमिका होती हे सिद्ध झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.