`...अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो`, शरद पवारांनी सांगितला किस्सा
Solapur News: शरद पवार यांनी (Sharad Pawar) सोलापूर आणि राजकारण यावर अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील किस्सा देखील सांगितला.
Solapur News in Marathi: सोलापूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, 'नॅब'चे संस्थापक माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हजेरी लावली होती. सत्कार कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी सोलापूर (Solapur News) आणि राजकारण यावर अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील किस्सा सांगितला.
काय म्हणाले Sharad Pawar ?
मी देशाचा संरक्षण मंत्री असताना एकदा मी ठरवलं, या देशामध्ये सगळ्यात उंच भाग कोणता आहे ? २० हजार फुटावरचा आणि त्याचे नाव सियाचीन हा भाग असा आहे. आपली भारताची हद्द संपली की, समोर एक २५ फुटावर पाकिस्तानची हद्द आहे आणि त्याठिकाणी अनेक वेगवेगळे संघर्ष होतात, ती जागा अशी आहे की तिथे -२० डिग्री सेल्सिअस तापमान आहे, २४ तास १२ महिने बर्फ असतो, चालायचा रस्ता देखील बर्फाचा; आमचे जवान त्याठिकाणी राहतात त्यांचे घर, टेंट हे कपड्याचे नसतात ते बर्फाचे असतात आणि त्या बर्फाच्या टेंटमध्ये त्याठिकाणी ते राहत असतात, असं शरद पवार म्हणतात.
आज या देशाचा जवान कोणत्या स्थितीत राहातो याची माहिती समाजातील नवीन तरुण पिढीला यावी म्हणून मी त्याठिकाणी अनेकदा जात असे, संरक्षण मंत्री म्हणून, पण अनेक वेळेला तरुण कार्यकर्ते की, ज्यांना देशाच्या संबंधीची आस्था आहे. त्यांना देशाचे वास्तव चित्र समजावे म्हणून कधी घेऊन जात असे. मला आठवतंय की, माझ्या एका सियाचीनच्या व्हिजिटमध्ये माझ्याबरोबर प्रकाश होते. आम्ही गेलो त्याठिकाणी, तो परिसर पाहिला, जवान ज्या प्रकारे रहातात त्यांच्याशी सुसंवाद केला आणि हे करून आम्ही परत निघालो तर त्या वेळेला पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला तसे आपल्या जवानांनी देखील गोळीबार सुरू केला आणि आम्हा लोकांची तिथून सुटका केली, असा किस्सा शरद पवार यांनी यावेळी सांगितला.
राजकारणामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. काही लोक नेतृत्व करण्यासाठी असतात, नेते बनून समाजाला मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतात आणि काही लोक मेहनत कष्ट करून २४ तास समाजासाठी वेळ देणारे, पदासंबंधी विचार न करणारे आणि जी विचारधारा आपण स्वीकारली त्या विचारधारेसंदर्भात प्रामाणिकपणाने कृती करणारे म्हणून ज्यांचे नाव घ्यावे लागेल ते प्रकाश यलगुलवार, असं शरद पवार (Sharad Pawar On Prakash Yalgulwar) म्हणतात.
दरम्यान, जे कोणी तरुण कार्यकर्ते, तरुण वर्गाचे नेते, माझ्या समवेत होते त्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक नेते व प्रकाश हे होते मला याठिकाणी नक्की आठवतंय. त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हे देशाचं एकंदर रक्षणाच्या संबंधीचे चित्रं हे जाणून घेण्याच्या बद्दलचे औचित्य या लोकांनी दाखवलं याचे मला मनापासून समाधान आहे. अनेक वर्ष समाजासाठी काम करणारे, सत्तेपासून बाजूला गेल्यानंतर सेवाभाव हा न सोडणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सोलापूर शहराने हा एक कर्तुत्वान हिरा या सामाजिक क्षेत्रासाठी दिला त्याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो. पुढची पिढी ही समाज सेवेमध्ये प्रामाणिकपणाने बांधिलकीतून राहावी, अशी प्रार्थना शरद पवार यांनी केली आहे.