उद्योगपतींना सहज कर्जमाफी मग शेतकरी कर्जमाफीची चर्चा का?-शरद पवार
शनिवारी शरद पवारांचा नागरी सत्कार औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
औरंगाबाद : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सवाल केला आहे, राष्ट्रीयकृत बँकांनी उद्योगपतींना ८० हजार कोटींची कर्जमाफी दिली, मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरकार चर्चा का करतं आहे?
राज्य सरकारच्या धोरणावर टीका करताना शरद पवार म्हणाले, उद्योगपतींना कर्जमाफी देऊ नये, या मताचा मी नाही मग शेतकऱ्यांच्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची एवढी चर्चा का करता?
शनिवारी शरद पवारांचा नागरी सत्कार औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकरी अडचणीत आहे, त्याला उभं करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे आश्वासन दिलं होतं तसं सरकार सत्तेवर येताच कर्जमाफी झाली होती मग महाराष्ट्रानं तुमचं काय घोडं मारलं होतं? महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपवर विश्वास दाखवला आणि त्यांच्या हाती सत्ता दिली, मग कर्जमाफी देण्यासाठी इतका उशीर का झाला? असंही शरद पवार यांनी विचारलं आहे.
शेतमालाला हमीभाव देणं आवश्यक आहे असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. भाजपनं तसं आश्वासन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं, अशी आठवणही शरद पवारांनी करून दिली.
कर्जमाफी दिली तर पैसे परत करण्याची सवय राहणार त्यामुळे बँकांचं अर्थकारण बिघडेल असा एक युक्तिवाद हल्ली होताना दिसतो, मात्र शेतकरी मेला आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर मनात काय ते विचारलं जातं, ‘देणं देईन’ म्हटलं की कावळा पिंडाला शिवतो.
शेतकरी कोणाचा एकही पैसा बुडवणार नाही हे लक्षात ठेवा, त्याला उभारी येईल म्हणून प्रयत्न करा, त्याला अडचणीच्या काळात त्याला मदत करा असा सल्लाही शरद पवारांनी सरकारला दिला आहे.