Sharad Pawar Supports Sanjay Raut: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळातील प्रतिनिधींबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन बुधवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या दिवसाचं काम गदारोळामुळे अर्ध्यात स्थगित करावं लागलं. संजय राऊत यांच्या विधानानंतर सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली. यानंतर सांयकाळी राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करावी की नाही यासंदर्भात निवडक आमदारांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांचं समर्थन केलं आहे. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये ठाकरे गटाचा एकही आमदार नसल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे. 


विधानमंडळाची मान-प्रतिष्ठा राखावी यात दुमत नाही, मात्र...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कोल्हापुरात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लीकेट, चोरांचं मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे.’ हे विधान केले. यावर विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला आहे. लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते," असं पवार यांनी म्हटलं आहे.



त्या विधानाचा विग्रह न करता ते...


तसेच, "गठीत केलेल्या समितीत ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही. हे योग्य नाही. संजय राऊत यांचे विधान ऐकले असता त्यांच्या म्हणण्याचा रोख दिसून येतो. हे विधान मूलत: विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. संजय राऊत यांनी जे विधान केले त्या विधानाचा विग्रह न करता ते एकत्रितरित्या वाचले अथवा ऐकले असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो," असं म्हणत शरद पवारांनी संजय राऊत यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.



टीका विधिमंडळाबाबत समर्थनीय नाही मात्र...


"यापूर्वी वसंतदादांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सरकारवर ‘अलीबाबा-चाळीस चोरांचे सरकार’ अशी टीका-टिप्पणी विरोधकांकडून झाली होती. अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधी ही समर्थनीय नाही. परंतु प्रकरण संयमाने हाताळावयास हवे," अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली आहे. "संजय राऊत यांनी केलेले विधान विधिमंडळाबाबत होते की विशिष्ट गटाबद्दल होते याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरित्या विचार व्हावा याकरता हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती," असंही पवार म्हणाले आहेत. 



या प्रकरणावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही आपलं मत नोंदवताना या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी होऊन काय तो निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.