पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा `तो` तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला.
Sharad Pawar Praises Kiran Sanap : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यातच काल बुधवारी (15 मे) नाशिकच्या दिंडोरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचार सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला. आता यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर तो आंदोलन करणारा तरुण हा माझ्या पक्षाचा असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी नाशिकमधील पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकली राष्ट्रवादीपासून मुंबईतील रोड शोसंदर्भात टीका केली. यावेळी शरद पवारांना पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांच्या गोंधळाबद्दल विचारण्यात आले. आता त्यावर शरद पवारांनी भाष्य केले. मोदींना सभेदरम्यान तरुण शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला, असा प्रश्न विचारला तर ते योग्य आहे. "मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. या सभेत घोषणाबाजी करणारा किरण सानप हा जर माझ्या पक्षाचा आहे का ते माहीत नाही. पण जर असं असेल तर त्याचा मला अभिमान आहे", असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी त्या तरुणाचे कौतुकही केले.
"राजकारण करण्यासाठी ते माझ्यावर टीका करत आहेत"
यावेळी शरद पवारांनी "नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढासळला असल्यामुळे ते भरकटले आहेत." नरेंद्र मोदी हे प्रचार भाषणात जे धार्मिक आरक्षण व इतर भूमिका घेतली त्यावर शरद पवार उत्तर दिले. "मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी मला गुजरातला घेऊन जायचे. मोदींना मी इस्रायलला घेवून गेलो होतो. आता मात्र राजकारण करण्यासाठी ते माझ्यावर टीका करत आहेत", असेही शरद पवारांनी म्हटले.
"महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे काय स्थान आहे, हे माहित नाही. नाशिक त्यांचा गड म्हणून सांगितले जाते. मात्र ते नाशिकात कुठे दिसत नाही", असेही शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या सभेत नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी कांदा शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कांदाप्रश्नी चर्चा करण्याची मागणी केली. कांदा आंदोलकांची घोषणाबाजी मोदींच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कांदा उत्पादकांनी पंतप्रधान मोदी यांना कांदा प्रश्नी बोलण्याची मागणी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेर काढले.