पुणे :  बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी ''सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळची गोष्ट सांगितली. बाळासाहेब म्हणाले होते की तुम्ही कमळीची काळजी करू नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरोखरच सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध निवडून आली, असा बहारदार किस्सा शरद पवार यांनी सांगितला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन 'शोध मराठी मनाचा' या मालिकेअंतर्गत करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली. राजकीय संस्कृतीबाबतच्या प्रश्नाबाबत बोलताना पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


पवार म्हणाले, सुप्रिया बाळासाहेबांच्या घरी लहान असताना खेळायला जायची. जेव्हा तिला राज्यसभेची उमेदवारी द्यायचे ठरले त्यावेळी बाळासाहेबांनी मला फोन केला. मी त्यांना त्यांची भूमिका विचारली. त्यावेळी ते म्हणाले, आमची मुलगी निवडणूक लढविणार असताना माझी वेगळी भूमिका काय असेल. ती बिनविरोध निवडून येईल. त्यावेळी मी सेनेच्या मित्रपक्षाच्या भूमिकेबाबत विचारलं. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते की तुम्ही कमळीची काळजी करु नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरोखरच सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध निवडून आली,''


''तुमच्या काकांशी माझा घरोबा होता. ते व्यासपीठावर माझ्याबाबत काय बोलायचे याबाबत बोलणे नको...मला बारामतीचा म्हमद्या...कुठलं तरी भरलेलं पोतं अशा उपमा द्यायचे. पण त्यांनी व्यक्तिगत सलोखा कधी सोडला नाही,'' असे गौरवोद्गार शरद पवार यांनी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काढले.