बारामती : एमआयएमने (AIMIM) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) युतीचा प्रस्ताव दिला आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसंच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामिल करण्याच्या चर्चांना वेग आला. यावरुन भाजपने शिवसेनेला चांगलंच डिवचलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असा आरोप करत एमआयएमबरोबर युती होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं. त्यानतंर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या प्रस्तावावर स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी MIMला महाविकास आघाडीत घेण्याची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळलीये. राष्ट्रवादीमध्ये राज्य पातळीवर असा निर्णय होत नाही, तर केंद्रीय नेतृत्व याबाबत ठरवतं असं पवार म्हणाले. MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. 


कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, पण ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे,  हा राजकीय निर्णय आहे, हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून एमआयएमबरोबर युतीची चर्चा सुरु आहे, पण आमच्या दृष्टीनं आणि माझ्या दृष्टीनं हा विषय संपल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


'काश्मिर फाईल्स'वर प्रतिक्रिया
दरम्यान, शरद पवार यांन काश्मिर फाईल्स सिनेमावरही प्रतिक्रिया दिली आहे. देश एका विचाराने चाललेला आहे, समाजातील सर्व घटक एकत्र आहेत, असं असताना पुन्हा समाजात दुरावा निर्माण होईल असं लिखाण किंवा चित्रपट हे टाळलं पाहिजेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 


ज्या सिनेमाबद्दल आता चर्चा सुरु आहे त्या सिनेमात कळत नकळत कॉंग्रेसला दोष देण्याचा प्रयत्न केला जातोय, कॉंग्रेसकडे सत्ता असताना हे घडलं आणि तेच याला जबाबदार आहेत असं दाखवलं जातंय, त्याकाळात देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे नव्हतं. त्यावेळी विश्वप्रताप सिंग यांच्याकडे देशाचं नेतृत्व होतं. याबाबत आज आवाज उठवणारे भाजपचे लोक विश्वनाथ प्रतापसिंगांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते.. 


त्यामुळं आज हा प्रश्न उचलून पुन्हा सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या संबध कालखंडामध्ये या सर्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करणारे भाजपचे घटक हे पूर्ण सहभागी होते.. त्यामुळे त्यांनी आता कारण नसताना हा विषय काढला हे योग्य नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.