नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांमुळे विरोधकांकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. उद्योजक मुकेश अंबानी  यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांची गाडी ठेवल्याचे प्रकरण, सचिन वाझे यांची अटक आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाची माहिती पवार यांनी यावेळी दिली. 


परमबीर सिंह यांच्या पत्रावर त्यांची सही नाही. सचिन वाझेंची पुन्हा नियुक्तीही परमबीर यांनीच केली होती. परमबीर सिंह यांचे आरोप त्यांची बदलीनंतर करण्यात आले आहेत. परंतु त्यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर  आहेत. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता. याप्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी. असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.


याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय  घेतील, असेही पवार यावेळी म्हणाले.