योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : ब्रेन डेड असलेल्या एखाद्या व्यक्तीचे महत्वपूर्ण अवयवदान केले जाणं तसं दुर्मिळ. नाशिक शहरातल्या विजया झळके यांनी हे दातृत्व दाखवलं. संपूर्ण राज्यात त्यांच कौतुक होत असलं तरी, त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा दानशूर व्यक्तीबाबत कुठलीही योजना नसल्यानं हे दातृत्व उपेक्षित ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी हलाखीची परिस्थिती असलेल्या झळके कुटुंबातील कर्ते आश्विन एका किराणा दुकानात काम करुन घर चालवायचे. मात्र, अपघात होऊन आश्विन थेट ब्रेन डेड अवस्थेत गेले. अशाही स्थितीत आश्विनची पत्नी विजया यांनी आपल्या पतीचे अवयव दान करुन अनेकांचे जीव वाचवण्याचा निर्णय घेतला... आणि किडनी, मेंदू आणि डोळ्यांसह आश्विन यांचे शक्य ते सर्व अवयव दान करुन विजया यांनी आपल्या पतीला एकप्रकारे अवयवदानातून अमरत्व दिलं. अत्यंत धीरानं उद्दात कार्य करणाऱ्या या धाडसी महिेलेला आज मात्र आपल्या दोन मुलांना कसं शिकवायचं? त्यांचा खर्च कसा भागवायचा? या प्रश्नांची चिंता भेडसावत आहे. 


अवयवदानाला प्रोत्साहन मिळावं याकरता आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक मदत दिली जात नाही. यावर उपाय म्हणून अशा प्रकारचं धाडसी पाऊल उचलणा-यांचा शासनाकडून किमान सत्कार, शासकीय निमशासकीय नोकरी किंवा तापुरत्या करार स्वरुपात नोकरी देण्याची गरज आहे. मात्र, सरकार असं जनताभिमूख पाऊल उचलण्याऐवजी, जाहिरात बाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात धन्यता मानत आहे. 


'झी २४ तास'ने नेहमीच समाजातील अशा उपेक्षित घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कशाचीही तुलना न होणारं अशा प्रकारे बहुमूल्य अवयवदान करुन, या महिलेनं समजात आदर्श निर्माण केला आहे. आता गरज आहे ती समाजानं या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची आणि तिच्या पाल्यांना सक्षम बनवण्याची.