Sheetal Mhatre Viral Video :  शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे (Sheetal Mhatre Viral Video) राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडिओचा मुद्दा राज्यात गाजतोय. मात्र त्याचवेळी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीतल म्हात्रेंचा हा व्हायरल व्हिडिओ आपणही दहा जणांना फॉरवर्ड केल्याचा खुलासा दानवे यांनी विधानसभेत केला. एवढंच नाही तर 32 देशांमध्ये हा व्हिडिओ पाहिला गेल्याचा टोलाही दानवेंनी लगावला. आता दानवेंच्या या विधानावरुन नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. हा व्हिडीओ त्या आमदाराच्या मुलाने फेसवुकवरून डिलीट का केला? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. हा व्हिडिओ डिलीट झाला याची देखील चौकशी करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. 


शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा आरोप युवानेते वरूण सरदेसाई यांनी केलाय. म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे? तो समोर आला पाहिजे असंही ते म्हणाले. 


 



शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ केलेल्या व्हिडिओची राज्य महिला आयोगानं दखल घेतलीय. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना सायबर गुन्हे विभागाला दिल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. यावरुन जितेंद्र आव्हाड आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात देखील विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. 


व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एसआयटीची स्थापना 


शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी विधानसभेत केली आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या 6 टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. सीनिअर आयपीएस अधिका-याच्या नेतृत्वात एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली.  


शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते साईनाथ दुर्गे याला पोलिसांनी अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. अनेक तास चौकशी केल्यानंतर  रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली.  शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली.


संजय राऊत यांची प्रतिक्रिया


शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ खरा आहे की खोटा याची चौकशी करा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करायला हवे अशी मागणी त्यांनी केली.