नवी मुंबई : Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आणि महापालिका विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय नाहटा आणि विजय चौगुले यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याने ,पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यांच्यासोबत गेलेल्या माजी नगरसेवकांवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतरच्या शिवसेनेला जोरदार फटका बसला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ दे. आपण पुन्हा शिवसेना जोमाने वाढवू, असे म्हटले. 


नवी मुंबई महापालिकेतीलही 30 पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी शिंदे यांची भेट घेतली आहे. यापूर्वी नवी मुंबईत ठाकरे यांच्यावरील नाराजी आणि शिंदे यांना पाठिंबा म्हणून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. तसेच मागाठणे विभागातील शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि कौस्तुभ महामुणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.


शिवसेनेला पुण्यातही मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील माजी नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.