Maharashtra Politics: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खूपच रंजक होणार आहे. कारण यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 2 गट एकमेकांविरोधात लढणार आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवताना त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी मंचर येथे उपस्थित होते. आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास केलाय. हा प्रवास आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुठपर्यंत जाणार? असा प्रश्न विचारला जातोय. यातून विविध चर्चांना उधाण आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे मंचर येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आढळराव पाटील उपस्थित होते. त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेद्वारी जवळपास निश्चित मानली जात आहे. 


आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार? याची सध्या मतदारसंघात चर्चा रंगलीय. मात्र उमेदवारी नक्की कधी जाहीर होते? आणि पक्षप्रवेश कधी होतो? हे ही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.


राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार?


राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार गटात जाणार का? अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का? असे प्रश्न विचारले जात आहेत. अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. 


"लोकांना असं वाटत हे कधीतरी एकत्र येतील का. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आता फाटी पडली आहेत. ते एका टोकाला आपण एका टोकाला आहोत, असे सांगत अजित पवारांनी शरद पवारांसोबत येण्याच्या चर्चा फेटाळल्या. 


राजकारण हा कोल्हेंचा पिंडच नाही


तसेच अमोल कोल्हेंबद्दलही त्यांनी भाष्य केले. मी अमोल कोल्हेंसाठी मत मागितली. नंतर कोल्हे दोन वर्षांनी राजीनामा देतो म्हटले. अमोल कोल्हे माझ्या व्यवसायावर परिणाम झाल्याने राजीनामा देतो म्हटले होते. खरंच राजकारण हा कोल्हेंचा पिंडच नाही. सेलिब्रीटींना तिकिट देतो यात आमच्या ही चुका आहेत. पण त्यांच्या डोक्यात काय असतं हे आम्हालासुद्धा माहित नसतं. शिवनेरीला भेटले तेव्हा कोल्हे म्हणाले मला परत निवडणुकीला उभं रहावस वाटतंय. असं कसं चालेल?," असे अजित पवार यावेळी म्हणाले.