आजपासून शिर्डीत बेमुदत बंद, साईमंदिर आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
आजपासून शिर्डीत बेमुदत बंद राहणार
शिर्डी : साईबाबांच्या जन्मभूमीच्या मुद्यावरुन शिर्डी आणि पंचक्रोशीतल्या लोकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आजपासून शिर्डीत बेमुदत बंद राहणार आहे. पंचक्रोशीतील गावांचाही बंदला पाठींबा दिला आहे. असे असले तरी भाविकांसाठी साईमंदिर आणि अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहाणार आहे.
शिर्डीच्या इतिहासात प्रथमच शिर्डी बेमुदत बंद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील सार्इंच्या जन्मस्थळासाठी १०० कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल अशी घोषणा मागील आठवड्यात केली होती. त्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटले आहेत. पाथरीला निधी देण्यास शिर्डीकरांची मुळीच हरकत नाही. मात्र साई जन्मस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण केली जाते याला शिर्डीकरांचा आक्षेप आहे. साईबाबांनी आपल नाव, गाव, जात, धर्म कधीही सांगितला नाही. यामुळेच ते जगभर सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.
यापूर्वीही साईबाबा आणि त्यांच्या आई वडीलांविषयी अनेक बोगस दावे करण्यात आले आहेत. या तथाकथित जन्मस्थानाच्या दाव्याने बाबांवर एका जातीचे, धर्माचे लेबल लावण्याचा प्रयत्न आहे. यामुळे बाबांच्या मूळ शिकवणुकीला व त्यांच्या प्रतिमेलाच धक्का पोहचणार आहे. यामुळे शिर्डीकरांचा जन्मस्थानाच्या दाव्याला आक्षेप आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साईभक्त आहे. त्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडून असा उल्लेख झाला असावा असे शिर्डीकरांना वाटते. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगण्याचाही ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. यापूर्वीही राष्ट्रपतींनी साई समाधी शताब्दीत जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. त्यावर शिर्डीकरांनी थेट दिल्लीत जाऊन वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडली होती.