कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : जर तुम्ही शिर्डी (Shirdi) साईबाबांचे भक्त असाल आणि दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. श्री साईबाबांच्या दर्शन पास आणि आरती पास सुविधांमध्ये साई संस्थान प्रशासनाने बदल केला आहे. त्यामुळे आता साईं बाबांच्या (Sai Baba) दर्शनाला येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ न देण्याची काळजी साई संस्थान घेणार आहे. यासाठी श्री साईबाबा संस्थानने (sai sansthan) उपाययोजना सुरु केल्या आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईबाब मंदिराच्या पूर्वीच्या दर्शन आणि आरती पासेसच्या पद्धती आता बदलण्यात आल्या आहेत. आता दर्शन पास व आरती पास घेण्यासाठी साईभक्तांचा मोबाईल नंबर आणि आधारकार्ड नंबर हा बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे यात गरज पडल्यास आणखी बदल केला जाणार असल्याचं श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी माध्यमांना सांगितलय. तर साईभक्तांची मंदिर परिसरातील दलालांकडून फसवणूक होऊ नये म्हणून साई संस्थानच्या आँनलाईन वेबसाईटवर बुकींग करावे असे आवाहन पी.शिवा शंकर यांनी साई भक्तांना केलय.


साई संस्थानने दिली महत्त्वाची माहिती


"साई संस्थानच्या माध्यमातून जे आरती पासेस दिले जातात त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता या पाससाठी मोबाईल क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. त्यातून भक्तांना पासचा ओटीपी जाणार आहे. तसेच आरती पास घेणाऱ्यांना आधार क्रमांकाचीही सक्ती करण्यात आली आहे. यासोबत व्हीआयपी पाससाठी देखील एका व्यक्तीचा आधार क्रमांक घेण्यात येणार आहे. गरज पडल्यास येणाऱ्या काळात दर्शन पासमध्येही हा बदल करण्यात येणार आहे. इथे येणाऱ्या सर्व साईभक्तांना विनंती आहे की, साई संस्थानच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पास बुक करु शकता. ज्यावेळी कोटा संपतो तेव्हा ऑफलाईन कोटा देखील असतो. त्यामुळे सर्व साईभक्तांनी ऑनलाईन सुविधांचा वापर करुन कुणाच्या आमिषाला बळी पडू नका. ऑनलाईन सुविधा वापरुन तुम्ही बुकिंग करु शकता आणि दर्शनाला येऊ शकता. तक्रार आल्यानंतर आम्ही बदल केले आहेत. काही लोक विनाओखळपत्राद्वारे पास घेतात आणि भक्त लोक ऐनवेळी आले की त्यांना ते विकले जातात. त्यामुळे आता यंत्रणेत बदल करण्यात आला आहे. आमचा जो दर आहे त्यामध्येच तुम्हाला पासेस मिळणार आहेत," अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी दिली.