अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानासाठी शिवसेना नेत्यांनीच आपल्याला फोन केला होता, त्यामुळेच आपण महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचा दावा श्रीपाद छिंदमनं केलाय. शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीबद्दल बोलताना त्यांनी 'हा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट' असल्याचंही म्हटलंय. आपल्या म्हणण्याचा पुरावा सादर करताना श्रीपाद छिंदम यांनी एक फोन रेकॉर्डिंगही पत्रकारांना ऐकवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी अहमदनगरच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी श्रीपाद छिंदम यांनी अनपेक्षितरित्या शिवसेनेला मतदान केलं. परंतु 'शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याकडून आम्हाला मत नको' असं सांगत शिवसैनिकांनी एकच गोंधळ घातला. इतकंच नाही तर, शिवसैनिक छिंदम यांच्या अंगावर धावूनही गेले. 


उल्लेखनीय म्हणजे, या निवडणुकीसाठी आधीच छिंदम यांनी पोलिसांकडून संरक्षणही मागून घेतलं होतं. 'पोलीस संरक्षण असल्यामुळे जास्त काही घडलं नाही... छिंदम यांना मारहाम करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार' असल्याचं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी म्हटलंय.