प्रफुल्ल पवार / अलिबाग : पेण अर्बंन बँक घोटाळ्यांमुळे गेली दहा वर्ष राजकारणापासून अलिप्त राहीलेले शिशिर धारकर (Shishir Dharkar is active in politics again) पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होत आहेत. पेण नगर पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा ते राजकीय भूमिकेत पहायला मिळणार आहेत. थेट निवडणुकीला उभे राहणार नसले तरी पेण विकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय आखाडयात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. धारकर हे पेण बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  एकेकाळी पेण नगर पालिकेवर धारकर घराण्याचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र पेण अर्बन घोटाळ्यानंतर बँकेवर घातलेल्या निर्बंधामुळे, त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही सुरुंग लागला . गेली दहा वर्ष ते राजकारणापासून अलिप्त होते. त्यांचे सहकारी कधी काँग्रेस आणि कधी भाजप मधून निवडून येत होते. आता मात्र पुन्हा एकदा निवडणूकीच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय धारकर यांनी घेतला आहे.


   पेण विकास आघाडी स्थापन करून सत्ताधारी भाजप विरोधात निवडणूकीत उतरत आहेत. ते स्वतः ही निवडणूक लढवणार नसले तरी मुलगा मिहीर आणि त्यांचे जुने सहकारी निवडणूक लढवणार आहेत, अशी घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे.


  गेल्या दहा वर्षात पेणच्या विकासाला खीळ बसला आहे. स्वच्छतेचा ठेका पुर्वी 36 लाखांना दिला जात होता. तो आता साडे तीन कोटींना दिला जात आहे. भुमिगत गटार योजना आणि भूमिगत विद्यूत वाहिन्यांच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. नाट्यगृह मोडकळीस आले आहे. तर भाजी मार्केटचे बांधकाम चुकीच्या पध्दतीने झाले आहे. गेल्या दहा वर्षात सत्ताधारी पक्षाला एकही लक्षवेधी काम करता आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला असल्याचे धारकर यांनी पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.


पेण अर्बंन बँकेवर केलेली कारवाई चुकीच्या पध्दतीने करण्यात आली, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी यावर काही बोलणे उचीत होणार नाही. मात्र न्यायालयात मी माझी आणि बँकेची बाजू मांडत आहे. न्यायालय त्यावर निर्णय घेईल अस विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


पेण अर्बन बँक घोटाळ्याचा खटला सध्या मुंबईतील ईडी न्यायालयात सुरू आहे. लाखो खातेदार अजूनही आपल्या ठेवी परत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशावेळी पुन्हा राजकारणात सक्रिय झालेल्या धारकरांना पेण कर कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीले आहे.