पालघर नगरपरिषद निवडणूक : शिवसेना - भाजप युतीचा तिढा सुटला
पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा सुटला आहे.
ठाणे : पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा सुटला आहे. यामध्ये नगराध्यक्ष पद शिवसेने करिता सोडले असून शिवसेना १९ आणि भाजप ९ जागा अशा पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एकत्र येऊन हा निर्णय झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांचे समाधान करण्यात शिवसेना यशस्वी ठरली असली तरी विद्यमान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना तिकीट न मिळाल्याने, काही निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून आली.
पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी २४ मार्चला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवट दिवस होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना गर्दी झाली होती. निवडणुकीचा कोणीही अर्ज भरला नव्हता. त्यामुळे शेवटच्या दिवशी एकच गर्दी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या तीन पक्षात आघाडी झाली असून जागावाटप निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे शिवसेना भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु होती. युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज उमेदवारी अर्ज भरण्यात आले. राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेमध्ये उमेदवारी वरून मोठा वाद रंगला होता. शिवाय शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी आयात केलेल्या उमेदवाराना संधी दिली जाते की निष्ठावंताना याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.