नाशिक : शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पहारेकरी चोर आहे. मग पहारेकऱ्यांचा साथीदार होण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. 


आगामी निवडणुकांसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत कलह असल्याचे समोर येत आहे. कोकणातून भाजपचे  जिल्हाअध्यक्ष प्रमोद जठार बंडाचा पवित्रा घेतला आहे. जठार यांनी नाणार प्रकल्पाला समर्थन देताना लोकांच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढविण्याबाबत विचार करत असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा प्रचार करणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे युती झाली मात्र, अंतर्गत संघर्ष कायम आहे. त्यामुळे विरोधकांना युतीच्या नेत्यांना डिवचण्यासाठी आयते कोलीत मिळत असल्याची चर्चा सुरु झाले आहे.