डोंबिबली : कोरोनाच्या ( Coronavirus) दुसऱ्या लाटेमध्ये अनेक मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवले आहे. डोंबिवलीतही अशाच एका कुटुंबातील आई-वडील गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. या स्तुत्य पुढाकाराबद्दल कौतुक करण्यात येत आहे. (Shiv Sena city chief Rajesh More accepts Guardianship of children who lost their parents by Corona)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीतील विनायक आणि मेधा चिंदरकर या दोन्ही मुलांचे पालकत्व शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आणि त्यांच्या पत्नी भारती मोरे यांनी स्वीकारले आहे. या मुलांचे वडीला सुदेश चिंदरकर यांचे काही महिन्यांपूर्वी कोविडमुळे निधन झाले. तर सुमारे 9 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरवल्याने या दोन्ही मुलांचा सांभाळ त्यांची आत्या वैशाली करत होत्या. मात्र, आता या मुलांच्या वडिलांनाही कोरोनाने हिरावून नेल्याने ही दोन्ही मुलं पोरकी झाली होती. 


दरम्यान, शिवसेनेने नेहमीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जपत या दोन्ही मुलांवर मायेचे छत्र धरले. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आणि गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच धावून जाणाऱ्या शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यापर्यंत या मुलांची माहिती पोहोचली. त्यानंतर मोरे दाम्पत्याने क्षणाचाही विलंब न लावता या मुलांचे पालक्तव स्विकारले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राजेश आणि भारती मोरे दाम्पत्याने दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी तातडीने भरघोस आर्थिक मदतही केली. त्यामुळे आईपाठोपाठ वडिलांचेही छत्र हरवलेल्या या दोन्ही मुलांच्या भविष्याचा मार्ग काहीसा सुकर होण्यात मदत होणार आहे.


समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र कोरोनाने हिरावून घेतले आहे. त्यांच्या दुःखावर मायेची फुंकर घालण्यासाठी समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही मोरे दांम्पत्याप्रमाणे अशाच प्रकारे सामाजिक भान आणि संवेदना जपत पुढे येण्याची गरज आहे.