दीपक भातुसे, झी मीडिया.मुंबई : सत्‍तेच्या बाजूने नाही तर सत्‍याच्या बाजूने उभे रहा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना दिला आहे.शेतकरी कर्जमाफी आणि शेतकर्‍यांच्या इतर प्रश्नावरून विधिमंडळात आक्रमक होण्याचे आदेशही त्‍यांनी आमदारांना दिले असल्‍याचे समजते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अधिवेशनावर शिवसेेनेची छाप पडली पाहिजे असा ठोस आदेशही उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे.


विधिमंडळाचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन मुंबईत सुरू झाले आहे. या  अधिवेशनाच्या पहिल्‍याच दिवशी उद्‌धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सर्व आमदार व खासदारांची महत्‍वाची बैठक बोलाविली होती.


काय झाली चर्चा?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनात पक्षाची छाप पडेल असे मुद्दे उपस्थित करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत.


शेतकर्‍यांचे न सुटलेले प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात मांडा. कर्जमाफी जाहीर केली मात्र त्याचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहचला नसेल तर त्याबाबत आवाज उठवा, असेही आदेश आमदारांना देण्यात आल्याचे समजते.


‘आश्वासनांबाबत आवाज उठवा’


निवडणुकीत दिलेल्या आणि पूर्ण न झालेल्या आश्वासनांबाबत आवाज उठवा, असे उद्धव ठाकरेंनी आमदारांना आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 


दक्षिण मुंबईतील ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी कर्जमाफी राज्‍य सरकारने जाहीर केली आहे.


नेमक्‍या किती शेतक-यांना कर्जमाफी मिळाली याची आकडेवारी सरकारकडून घ्‍या, असे उद्‌धव ठाकरे यांनी आपल्‍या आमदारांना सांगितल्‍याचे समजते.


याशिवाय निवडणुकीत दिलेल्या आणि पूर्ण न झालेल्या आश्वासनांबाबत आवाज उठवा असे आदेश उद्धव यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.


उद्धव ठाकरे  यांच्या या आदेशानंतर शिवसेनेचे मंत्री आता काय भूमिका घेणार, अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक होणार का, याबाबत उत्सुकता आहे.