शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची ऑडिओ क्लिप वायरल, घराबाहेर सुरक्षा वाढवली
आता प्रवाहासोबत जाणे चांगले असल्याचं धैर्यशील माने या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत
Maharashtra Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyashil mane) यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खासदार धैर्यशील माने यांची एक ऑडिओ क्लिप वायरल होत आहे, आपल्या कार्यकर्त्याशी बोलतानाचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
शिवसेना खासदार धैर्यशील माने शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात खासदारांकडून पत्रकार परिषद घेण्यात येणारेय. मात्र त्याआधी धैर्यशील माने यांची एक ऑडिओ क्लिप आता वायरल होत आहे. आता प्रवाहासोबत जाणे चांगले असल्याचं धैर्यशील माने या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत.
ऑडिओ क्लिपमध्ये काय?
या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार धैर्यशील माने आपल्या एका कार्यकर्त्याबरोबर संभाषण करत आहेत. त्यात ते म्हणतात 'उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं यासाठी मी महिनाभर झटतोय, दुरावा होऊ नये, शिंदे साहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं, शिवसेना एकत्र यावी यासाठी आम्ही सगळ्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलंय.
पण काही गोष्टी हाताबाहेर चालल्यात. आता आपल्या हातात नाही, नेतृत्वाने निर्णय घेतला की आपल्याला मर्यादा येतात. आणि खरं सांगायचं तर आपण काहीच निर्णय घेत नाही, परिस्थितीचे बळी आहोत, आपण काय साहेब म्हणतील त्याच पद्धतीने काम करणारी मंडळी आहोत. पण दुर्दैवाने अशी राजकीय परिस्थिती कुणाच्याही आयुष्यात येऊ नये, आणि माझं काय मी कधी छक्के पंजे करणारं राजकारण करत नाही मी सरळ मार्गी आणि स्टेट फॉरवर्ड, ना कधी पैशाच्या मागे लागयोय जे सरळ आहे ते करत राहिलो. आता भावनिक टच साहेबांकडे आहे आपण शिवसेना सोडत नाही, शिवसेना अंतर्गत वेगळी होतेय, आणि शिंदे गटसुद्धा स्वत:ला वेगळ म्हणत नाही, म्हणजे आपण शिवसेना सोडली असं होत नाही, असं या ऑडिओ क्लिपमध्ये धैर्यशिल माने सांगतायत.
धैर्यशील मानेंच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला
दरम्यान, धैर्यशील माने शिंदे गटात सामी होणार असल्याच्या चर्चेनंतर त्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी इथल्या घरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.