Lok Sabha Election 2024 : मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातर्फे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अमोल किर्तीकर यांच्याविरोधात कोणला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाला पडला आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून अभिनेते शरद पोंक्षे आणि जोगेश्वरीचे विद्यमान आमदार रविंद्र वायकर यांच्या नावाची चाचपणी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळलाी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या पेक्षा आमदार रविंद्र वायकर यांना उमेदवारी दिली तर विजय सोपा होई. यामुळे रविंद्र वायकर यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमदार रविंद्र वायकर सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करत आहेत.


उमेदवारी जाहीर होताच किर्तीकरांच्या मागे ईडीचा ससेमिरा


अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावलंय. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीनं बैठक घेतली. `स्वत:ला अमोल किर्तीकर समजून कामाला लागा´ असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांना दिलेत. तर भाजपनं खालच्या पातळीवरचं राजकारण केलं असून उमेदवारी जाहीर झाल्यामुळेच ईडीनं कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय.  तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम अमोल किर्तीकरांच्या उमेदवारीवरुन नाराज झालेयत. अमोल किर्तीकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने सहकार्य न करण्याची घोषणा निरुपमांनी केलीय आणि खिचडीचोर म्हणत अमोल किर्तीकरांना डिवचलंसुद्धा.


कोण आहेत अमोल कीर्तिकर ?


अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव आहेत. गजानन किर्तीकर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. तर अमोल किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवत ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतलाय.. उद्धव ठाकरेंनीही उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली.