Uddhav Thackeray: महाविकास आघाडीचा आज मेळावा आज होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा होती. तसंच, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षविधान करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील, अशी चर्चा रंगली होती. त्यावरुन ठाकरेंनी विरोधकांना सुनावत एक वक्तव्य केलं आहे. 'आघाडीत काड्या करणारे लोक युतीमध्ये बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे होणार की कोण होणार? यावर मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही आलात किंवा पवार साहेब तुम्ही आलात. आज तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, माझा त्यांना पाठींबा आहे. मी स्वत:साठी लढत नाही. ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं त्या क्षणापासून पुन्हा मी लढतोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 


'आत्ताच सांगतो आम्ही सेना-भाजप युती 25-30 वर्ष होतो. त्या युतीची पुनरावृती नकोय मला. ज्याचा सर्वात जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या धोरणामुळं पाडापाडी होते. त्यामुळं अगोदर ठरवा आणि मग चला पुढे मला काहीच हरकत नाही. पण भाजपच्या अनुभवाची पुनरावृती नको,' असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट म्हटलं आहे. 


'लोकसभेत आपण राजकीय शत्रुला पाणी पाजलंच आहे. लोकसभेची लढाई ही संविधानाच्या व लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आजची लढाई ही महाराष्ट्र धर्म, अस्मिताच्या रक्षणासाठी आहे. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. मागे मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची अशी जिद्द पाहिजे की एक तर तु राहिन किंवा मी राहिन,' असंही त्यांनी म्हटलं आहे.