...म्हणून जळगावात उन्मेष पाटील नाही तर करण पवार यांना उमेदवारी, ठाकरे गटाने डाव टाकला
Loksabha Election: शिवसेना ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
Loksabha Election: जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याविरोधात महाविकास आघाडीने करण पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उभे केले आहे. करण पवार यांची उमेदवारी भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कोण आहेत करण पवार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यावेळी एकूण 4 उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. हातकणंगलेतून सत्यजित पाटील, कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामडी तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात ही लढत होणार आहे.
दरम्यान, भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षप्रवेश केल्याने जळगावमधून ठाकरे गट उन्मेश यांना संधी देणार असल्याची चर्चा होती. मात्र, ठाकरे गटाने उन्मेश पाटील यांचे निकटवर्तीय असलेले करण पवार यांना उमेदवारी देत भाजपला धक्का दिला आहे.
करण पवार यांना उमेदवारी का?
करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचा पारोळा, एरंडेल, भडगाव या तालुक्यात चांगला जनसंपर्क आहेत. करण पवारांचे काका व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचाही पाठिंबा करण पवार यांना लोकसभेसाठी मिळू शकतो. तसंच, उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचीही साथ त्यांना या निवडणुकीत मिळू शकते. याशिवाय महाविकास आघाडीतील तीन पक्षांची ताकद यामुळं करण पवार यांची उमेदवारी भाजपला डोकेदुखी ठरु शकते. भाजपमधील अंतर्गंत नाराजीचा फायदाही करण पवार यांना होऊ शकतो.
कोण आहेत करण पवार?
करण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. ते पारोळ्याचे माजी लोकयुक्त नगाराध्यक्ष आहेत. तर, त्यांचे वडीलदेखील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. पारोळा-एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत. इतकंच नव्हे तर, राजकारणातील मराठा समाजाचा तरुण चेहरा म्हणूनही त्यांची तालुक्यात ओळख आहे.