सोलापूर: मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची साथ दिल्यानंतर आता पक्षात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सोलापुरातील नाराज शिवसैनिकांनी गुरुवारी तानाजी सावंत यांच्याविरोधात बॅनर लावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बॅनरवर तानाजी सावंत याचा चेहरा खेकड्याच्या छायाचित्रासह मॉर्फ करण्यात आला आहे. तसेच बॅनरवर ' उद्धवसाहेब हा खेकडा सोलापूर आणि धारशिवची शिवसेना पोखरत आहे. वेळीच नांग्या मोडा', असा मजकूर लिहण्यात आला आहे. 


उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपला साथ दिली होती. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांच्या गटातील सात सदस्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली होती. 


शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची बंडखोरी, भाजपसोबत हातमिळवणी


तानाजी सावंत यांचा शिवसेनेत चांगलाच दबदबा असूनही उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपद नाकारले होते. यासाठी तानाजी सावंत यांनी जलसंधारण मंत्री असताना केलेले एक वक्तव्य कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून अनेकांचा बळी गेला होता. याविषयी प्रतिक्रिया विचारल्यानंतर तिवरे धरण खेकड्यांनी फोडले, असा अजब दावा तानाजी सावंत यांनी केला होता. हाच धागा पकडत शिवसैनिकांनी आज त्यांच्यावर निशाणा साधला.