`राष्ट्रवादी आणि अमोल कोल्हेंचं हिंदूत्त्व बेगडी आहे`
शिंदे गटातील या बड्या नेत्याने साधला राष्ट्रवादीवर निशाणा
Shivajirao Adhalarao Patil On NCP & MP Amol Kolhe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरून बाहेर पडत भाजपसोबत युती केली. येत्या निवडणूकीतही हिंदूत्त्वावरून राजकारण तापताना दिसत आहे. हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर तोफ डागताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर आणि शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
तुमचा जो नौटंकीपणा आहे तो भाजप काय सर्व पक्षांना आणि जनतेला माहित आहे. तुम्ही कोणाला कितीही खूश करायला गेले तरी एका बाजूला गोडसेंची तळ उचलून धरत आहात. औरंगजेबाची बाजू घेत आहात, औरंगाबादला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देऊन कुठे विकास होणार आहे का?, हा दुटप्पीपणा लोकांनी गेली तीन वर्षात तुमच्याकडून पाहिलेला आहे. राष्ट्रवादी आणि अमोल कोल्हेंचं हिंदूत्त्व बेगडी असल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
यावर अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी 15 वर्षे शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व करत असताना संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास व्हावा यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. अशा व्यक्तिंनी माझ्या शिवशंभू भक्तीविषयी आणि हिंदूत्त्वाविषयी बोलणं उचित ठरणार नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, शिरूर मतदारसंघामधील माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे राजकीय नाते संपूर्ण पुणे जिल्ह्याला परिचित आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही तिथल्या स्थानिक राजकारणावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली होती. आता पाटील शिंदे गटात सामील झाल्याने राष्ट्रवादी विरोधात शिंदे गट- भाजप अशी चुरस पाहायला मिळणार आहे.