रायगड: कोरोनाच्या संकटामुळे यंदा किल्ले रायगडावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. काहीवेळापूर्वीच राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रायगडावरून थेट प्रक्षेपण होणार होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे रायगड जिल्ह्याच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवरसुद्धा पडले आहेत. रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करु, अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन दिली. 



६ जून रोजी दोशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येमुळे यंदाच्या वर्षी एकही सण साजरा करता आलेला नाही. त्यामुळे किल्ले रायगडावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.