रत्नागिरी : सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर आली आहे. शिवसेना आणि भाजप युती झाली असली तरी सेनेच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचे संकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत कार्यकत्यांसोबत बैठक घेतली. शिवसेनेच्या खासदारांनी पाच वर्षांपासून दिलेली वागणुक आणि भाजपाच्या नेत्यांविरोधात ओकलेली गरळ यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला साथ देणार नसल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, असे असले तरी हा मतदार संघ भाजपसाठी सोडावा आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना या मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतांनी केली आहे.


युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना येथेही हीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे युती झाली तरी वादाची ठिणगी कायम दिसून येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवाच, या मागणीसाठी शिवसैनिक अजूनही आग्रही आहेत. तसेच कोल्हापुरात चित्र वेगळे आहे. भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोल्हापुरात युतीचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक विरूद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक असा सामना होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक कितीही जवळचे असले तरी युतीचा उमेदवार म्हणून संजय मंडलिकांचा प्रचार करणार असे काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितले.


जालन्यात दानवे-खोतकर वाद


दरम्यान, जालना येथे खोतकर आणि दानवे असा वाद निर्माण झालाय. त्यामुळे आज भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यासह जिल्ह्यातील संतप्त शिवसैनिकांनी खोतकरांच्या जालन्यातील घरी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. खोतकर हे दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय अजूनही मातोश्री वरून झालेला नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख काय निर्णय घेतात याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागले आहे. दरम्यान ठिय्या मांडल्यानंतर शिवसैनिकांनी अर्जुन खोतकर यांना देखील घेराव घालून आपली मागणी व्यक्त केली.दोन दिवस मला द्या,या दोन दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णय घेतो.मात्र पक्ष प्रमुखांचा निर्णय अंतिम राहील असंही खोतकर म्हणाले.कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या भावनेचा विचार पक्षात होईल, अशी अपेक्षाही खोतकर यांनी व्यक्त केली.