युती सत्तेसाठी नाही, या मुद्यांसाठी आहे - आदित्य ठाकरे
युतीबाबत तसेच आगामी उपमुख्यमंत्रिपदाबाबत युवा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना सूचक मौन.
नागपूर : शिवसेना - भाजप युतीबाबत तसेच आगामी उपमुख्यमंत्रिपदाबाबत युवा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना सूचक मौन बाळगले आहे. मात्र, युती कशासाठी आहे, यावर भाष्य केले. शिवसेना - भाजप युती मुद्द्यांसाठी आहे. सत्तेसाठी नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होणार की नाही, कोण निर्णय घेणार तसेच उपमुख्यमंत्री कोण होणार, यावार आदित्य यांनी भाष्य टाळले.
युतीबद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. तेच याबद्दल बोलतील. मी त्यांच्यासमोर खूप लहान आहे. म्हणून युती बद्दल बोलणार नाही, असं आदित्य ठाकरेंना नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितले.
उपमुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा केली असता, मी हे पेपर आताच फोडणार नाही. मात्र, जनता जी जबाबदारी देईल, ती घेईन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शिवसेना - भाजप युती मुद्द्यांसाठी आहे. सत्तेसाठी नाही. आमच्या समोर कर्जमुक्ती, विकास, राम मंदिर असे अनेक मुद्दे आहे. ते आम्हाला साध्य करायचे आहेत, असेही आदित्य यांनी सांगितले.