शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकरांवर टीका तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक!
पुण्यातील कोरेगाव-भिमामध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने बुधवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या भूमिकांवर टीका केली.
मुंबई - पुण्यातील कोरेगाव-भिमामध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने बुधवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या भूमिकांवर टीका केली. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर महाराष्ट्रात जातीय विष पेरले गेले. त्यानंतरच कोरेगाव भिमामध्ये जातीय दंगल उसळली. राज्यात इतका विखारी जातीय उद्रेक कधीच झाला नव्हता. यात सामान्य जनतेची होरपळ झाली. प्रकाश आंबेडकर हे आगीत तेल ओतून या प्रकरणाचा भडका का वाढवीत होते, त्यांना नेमके काय करायचे होते, असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात विचारण्यात आला आहे. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचे कौतुकही करण्यात आले आहे.
प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर लगेचच पुणे न्यायालयाने त्यांना सोडण्याचे आदेश दिले. आता १२ फेब्रुवारीपर्यंत तेलतुंबडे यांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. हे सर्व घडल्यानंतर पुणे पोलिसांनी काहीच न करता हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांत बसायचे का, असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे. अग्रलेखात म्हणण्यात आले आहे की, 'या बुद्धिवाद्यांनी केलेला विखारी प्रचार, त्यांचे संभाषण याबाबत पोलिसांनी पुरावे सादर केले. हे सर्व लोक देश अस्थिर करण्यामागचे सूत्रधार होते. पुन्हा शिकलेसवरलेले असल्याने आणि मोठ्या लोकांत ऊठबस असल्यामुळे त्यांना प्रतिष्ठेचे एक वलय मिळाले होते. प्रशासन, न्याय व्यवस्था, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लागेबांधे निर्माण करून स्वतःभोवती कवचकुंडले निर्माण केली व त्याचा फायदा घेऊन ही मंडळी देशात नक्षलवाद, माओवादाचा विध्वंसक विचार पेरीत आहेत. त्या अर्थाने ही मंडळी दहशतवादाचे प्रायोजक किंवा प्रचारक म्हटले पाहिजेत व आनंद तेलतुंबडे यांच्यावर हाच ठपका आहे.'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक
अग्रलेखात लिहिण्यात आले आहे की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे दहशतवादी असे प्रकाश आंबेडकर व त्यांचे साथी सांगतात. त्यांचा साथी म्हणजे हैदराबादचा ओवेसी आहे आणि हेच लोक कन्हैयाकुमार, तेलतुंबडे, जिग्नेश मेवानीचे समर्थन करतात. संघ हा प्रखर राष्ट्रवादी आहे. चीन, रशिया, पाकिस्तानात त्यांनी शहाणपण गहाण टाकलेले नाही व आंतरराष्ट्रीय ‘स्कॉलर्स’ची पदवी लावून ते फालतू एल्गार करीत नाहीत हा फरक समजून घेतला पाहिजे.' हिंदुत्वाचा द्वेष हाच या मंडळींचा विचार आहे. आणि हेच विचारवंत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन देशाची बदनामी करीत आहेत, अशी टीका सामनातील अग्रलेखात करण्यात आली आहे.