भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप
त्या आत्महत्येमागे ही कर्डिलेंचा हात असल्याचा आरोप
अहमदनगर : अहमदनगर प्रकरणात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अहमदनगर येथील उद्योजक बाळासाहेब पवार यांनी आठ दिवसांपुर्वी स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येलाही जगताप, कोतकर आणि कर्डीले जबाबदार असल्याचा राठोड यांनी आरोप केला आहे.
पवार यांनी लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये या सर्वांची नावे आहेत. मात्र पोलीसांनी सुसाईड नोट दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. पवार आत्महत्येचा योग्य तपास होऊन ख-या आरोपींवर कारवाई झाली असती तर शिवसैनिकांचे हत्याकांड टळले असते असा थेट आरोप अनिल राठोड यांनी केला आहे.
केडगाव इथे शिवसैनिकांच्या झालेल्या हत्या भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगनमताने झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय. याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याने या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच असल्याचा आरोप करत उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं रामदास कदम म्हणाले. या घटनेला जबाबदार एक पोलीस निरिक्षक आणि एक डीवायएसपींना तातडीने निलंबीत करण्याची मागणी कदम यांनी केली.
अहमदनगर केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर, शिवसेना आपल्या मागणीवर आक्रमक झाली आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनाही अटक करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सर्व मुख्य आरोपींना अटक केल्याशिवाय, अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ही माहिती दिली आहे.