मुंबई : स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशावर शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सडकून टीका केली आहे. नारायण राणेंना भाजपात घेणे म्हणजे दुधात मिठाचा खडा टाकणे अशा शब्दात त्यांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली. राणेंकडे एकच आमदार आहे तो देखील कॉंग्रेसचाच त्यामुळे त्यांना भाजपात घेऊन उपयोग काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नारायण राणे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नारायण राणेंना पक्षात घेणार नाहीत असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा राजकारणाचा चढता आलेख अनुभवलेले नारायण राणे सध्या राजकीयदृष्ट्या अडचणीत आहेत. एकेकाळी राजकारणात प्रचंड दबदबा असलेल्या राणेंसमोर राजकीय भवितव्याची चिंता आहे. नारायण राणेंची प्रत्येक राजकीय हालचाल ही राज्यात राजकीय भूकंप घडवणारी ठरली आहे. आताही नारायण राणे काय करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या राणेंकडे भाजपात जाणे किंवा स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व ठेवून निवडणूक लढवण्याचा पर्याय समोर आहे. राणेंनी जर पहीला पर्याय निवडला तर भविष्यात युती न झाल्यास शिवसेने विरोधात भाजपा भविष्यात राणे अस्त्राचा वापर करु शकते.