`अमृता फडणवीसांना आवरा`, शिवसेना नेत्याचं संघाला पत्र
राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा
नागपूर : राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा असं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता. त्याचा निषेध करत किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांचीही तक्रार करण्यात आली आहे.
'कोषातल्या किड्याला जगण्यातली गंमत कधी कळणारच नाही. वडिलधाऱ्यांनी त्याच्यासाठी विणलेल्या रेशमी कोषाच्या आधारावरच तो जगतो. देवेंद्र फडणवीस, तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे,' असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. यावरुनच तिवारींनी संघाला हे पत्र लिहिलं आहे.
शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील मात्र भाजपनं नाही असं वक्तव्य फडणवीसांनी आझाद मैदानातल्या भाषणात केलं होतं. त्यावरून आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. अशा प्रकारचं वक्तव्य तुम्हाला शोभत नाही असं ट्विट करून फडणवीसांवर टीका केली. माजी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावरुनच अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं.