मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून सामनातून पुन्हा एकदा भाजपा सरकारवर टीका करण्यात आली आहे. गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. ‘भारतरत्न’ देऊन सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कुणी रोखलं होतं? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. सावरकरांना माफीवीर आणि कलंक म्हणून हिणवणारे विधानसभेत भाजपच्याच बाकावर असल्याचा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावरकरांवर नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता विधेयकावरून देश का पेटला ? याचा विचार करा असा प्रश्न भाजप केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे. नागपूर अधिवेशनात सावरकर प्रश्नावरुन विरोधी पक्षातर्फे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. पहिल्या दिवशी भाजपचे आमदार 'मी सावरकर' च्या टोप्या घालून अधिवेशनाला आले होते.  राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार विरोधकांनी व्यक्त केला तर दुसऱ्या दिवशी सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदतीबाबत चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. गोंधळातच विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं.



अधिवेशनाचा दुसरा दिवस देखील असाच गोंधळाचा ठरला. भाजप आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर झळकावले. हे प्रकरण हमरीतुमरीवर आले. यावर अध्यक्षांनीही नाराजी वर्तवली. विरोधी पक्षनेते पहिल्या दिवसापासूनच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. या सर्व बाबींचा समाचार आज सामनातून घेण्यात आला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात सुरु असलेल्या हिंसाचाराकडून लक्ष हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 


सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच. गेली साडेपाच वर्षे केंद्रात सत्ता असताना सावरकरांना भारतरत्न देण्यापासून कोणी रोखले होते ? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात सोंग आणि देशात ढोंग असा सगळा तुमचा प्रकार सुरु असल्याची बोचरी टीका देखील भाजपवर करण्यात आली आहे.