देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही - संजय राऊत
Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. तसंच महाराष्ट्रात सत्तांतर घडवावं लागेल असंही विधान केलं आहे. या सर्वांवर गंभीर आर्थिक गुन्हे आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हरुन अल रशीदची पोरं म्हटलं.
मातोश्रीवर झालेल्या मराठा आंदोलकांमध्ये भाजपाचे पदाधिकारी होते असा आरोप होत असल्यासंबंधी ते म्हणाले की, "ही भाजपाचा कारस्थानं असतात. याला राजकारणातला फडणवीस टच म्हणतात. महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही. जर महाराष्ट्र सुखात, शांततेत नांदवायचा असेल तर सत्तांतर घडवावं लागेल. आणि हा जो कचरा आहे या सर्वांवर गंभीर आर्थिक गुन्हे आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील".
'हरुन अल रशीदची पोरं आहेत'
"एकनाथ शिंदे यांनी मौलवीचा वेष धारण करुन दिल्लीत प्रवेश केला होता. अनेक वेषांतरं केल्याचं त्यांचेच लोक सांगत आहेत. भुजबळांनी सीमाभागातील लढ्यासाठी वेषांतर केलं होतं आणि महाराष्ट्राला ते आवडलं होतं. त्यांनी महाराष्ट्रासाठी लाठ्या खाल्ल्या होत्या, तुरुंगवास भोगला होता. अशाप्रकारे राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी भूमिका वठवण्यात आल्या आहेत. गेल्या अडीच- तीन वर्षात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नकली दाढी मिश्या टोप्या लावून वेषांतर करुन फिरत आहेत. ही हरुन अल रशीदची पोरं आहेत. तो अशी वेषांतरं करत फिरायचा," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
"राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना ते काय करत होते? ते जेम्स बाँड आहेत ना? त्यांना मुंबई, दिल्लीतील विमानतळांची सुरक्षा धोक्यात असतानाही कळलं नाही," अशी विचारणाही त्यांनी केला.
"महाराष्ट्रात नाटकाला, रंगभूमीला प्रतिष्ठा आहे. पण जो प्रकार सध्या सुरु आहे तो देशाला घातक आहे. तुम्ही खोटी नावं, वेषांतरं, बोर्डिंग पास, ओळखपत्रं तयार करुन मुंबई, दिल्लीसाऱख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवरुन प्रवास करता. याचा अर्थ सीआरपीएफला अमित शाहांनी यांनी सोडा असं कळवलं होतं. याप्रमाणे आधी दाऊद, माल्ल्या, मेहुल चोक्सी, टायगर मेमन यांना सोडलं आहे का हा चिंतेचा विषय आहे. गृहखात्याच्या सूचना असल्याशिवाय खोट्या नावाचे बोर्डिंग पास मिळूच शकत नाहीत. अनेकदा आम्हाला, मंत्र्यांना थांबवण्यात आलं आहे. खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड तयार करण्यात आले आहेत. सुरक्षित बाहेर पडता यावं यासाठी दिल्लीच्या गृहमंत्रालयाच्या खास सूचना असलायच हव्यात," अशी शंका त्यांनी उपस्थित केली.
शर्मिला ठाकरेंचं कौतुक
सुनील तटकरे फिरता रंगमंच असून त्यांनीही अजित पवारांना अडचणीत आणलं होतं. गद्दार, बेईमानांनी स्वाभिमानाच्या गोष्टी करु नयेत असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या विधानाचं कौतुक केलं. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो, असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलं होतं. त्यांचं हे निवेदन आवडल्याचे संजय राऊत म्हणाले. गेल्या काही काळापासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. यामध्ये सगळ्याच धर्माचे लोक आहेत, आपलेसुद्धा आहेत. ही एक विकृती आहे. ही विकृती ज्याच्या मनामध्ये आहे. तो कोणत्याही धर्माचा असो त्याला फासावर लटकवलं पाहिजे असं सजय राऊतांनी सांगितलं.