मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी तर शिवसेना-भाजपची युती झाली होती. पण आता चित्र वेगळंच पाहायला मिळतं आहे. महायुतीमध्ये लढूनही शिवसेना या युतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी एकत्र लढलेले भाऊ आता वेगळा संसार थाटण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमधील दरी आणखीनच वाढली आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असं शिवसेनेचं म्हणणं आहे तर मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हा सत्तासंघर्ष आणखी वाढला आहे. त्यामुळेच आता शिवसेना नव्या पर्यायांचा विचार करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करण्याच्या मार्गावर दिसत आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरी शिवसेनेक़ड़ून दिली जाणारी प्रतिक्रिया हेच दर्शवते आहे. दुसरीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबरोबरच केंद्र पातळीवरील नेतेही आग्रही आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी जवळीक असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. 


राज्यातील बहुतांश काँग्रेसचे आमदारही शिवसेनेबरोबर जाण्यास तयार आहेत. आता केवळ सोनिया गांधींच्या होकाराची प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची भूमिकाही काँग्रेसबरोबर जाण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीची भूमिका तर याबाबत सकारात्मक आहे. भाजपने सरकार स्थापन केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात मतदान करेल असं नवाब मलिक यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. 


सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी काल राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजे भाजपाला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली होती. आज भाजपची महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्य़े अल्पमतातील सरकार स्थापन करण्यास भाजप तयार नसल्याचं कळतं आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातही वेगवाग घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी चर्चा करुन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं पुन्हा एकदा म्हटलं आहे. त्यामुळे हे राजकारण आहे येथे काहीही होऊ शकतं हे महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवलं आहे.