संजय राऊतांना दिलासा नाही, कोठडीतील मुक्काम वाढला
गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या राऊतांच्या कोठडीत वाढ
मुंबई : गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणामध्ये अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज राऊतांना बेल की जेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र आजही राऊतांना दिलासा मिळालेला नाही.
आज झालेल्या सुनावणीमध्ये संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 14 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा 5 सप्टेंबरपर्यंत आर्थर रोड तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. 30 जुलै रोजी राऊतांना ईडीने अटक केली होती.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांची 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी संपत असल्यानं राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. किमान आजच्या सुनावणीमध्ये राऊतांना जामीन मिळेल अशी शक्यता वाटत होती मात्र आजही पार पडलेल्या सुनावणीमध्येही राऊतांना दिलासा मिळालेला नाही.