Sanjay Raut on Ram Mandir Ayodhya: संपूर्ण देशभरात सध्या अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची चर्चा सुरु आहे. एकीकडे अयोध्योत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असताना दुसरीकडे कोणते दिग्गज उपस्थित राहणार याची चर्चा रंगली आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांना आमंत्रणच मिळालं नसल्यानेही राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन नाराजी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आम्ही आमंत्रणाची वाट पाहत बसलेलो नाहीत. तो भाजपाचा कार्यक्रम आहे. तो 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा कार्यक्रम नाही. हा पक्षीय कार्यक्रम आहे. राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही लक्ष घातलं असतं. त्यांना झेंडा फडकवू द्या, फोटो काढू द्या. आमचं काही म्हणणं नाही, राम सर्वांचे आहेत. असं राजकारण पाहून रामाच्या आत्म्याला त्रास होईल आणि पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करु नका," असं संजय राऊत म्हणाले आहेत. 


16 जानेवारी 2024 पासून अयोध्येतील राम मंदिरात विधिवत पूजा सुरु होणार असून 22 जानेवारी 2022 मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. ज्यानंतर भक्तांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं 'आरती पास' ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रभू श्रीरामांची तीन पद्धतींनी आरती होणार असून, भाविकांना त्यांच्या प्राधान्यानं आरतीसाठीचे पास निवडण्याची आणि बुकिंग करण्याची मुभा असेल. 


'23 जागांवर लढणार'


"आम्ही 23 जागांवर लढलो होतो आणि 18 जागा जिंकल्या होत्या. संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने हारलो होतो त्यामुळे 19 झाल्या. शिरुरची जागी आम्ही लढली तिथे आता राष्ट्रवादीचा खासदार आहे. आम्ही जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही हे धोरण ठरलं आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात जागा जिंकल्याच नव्हत्या. पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिंकू शकातत मदत होऊ शकते तिथे ते सोबत राहणारच आहेत. यावर दिल्लीचं हायकमांड आणि आमचं एकमत झालं आहे. त्यामुळे त्यावर जर राज्यातील कोणी बोलत असेल तर गांभीर्याने पाहण्याची गरज नाही," असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. 



'राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण'


"राहुल गांधी लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी संपूर्ण देशाला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जोडत आहेत. राहुल गांधींकडे चेहरा आहे. त्यांचा संघर्ष सुरु आहे. लोकांना असा संघर्ष करणारा नेता आवडतो. ते खोटं बोलत नाहीत, प्रामाणिक आहेत, देशभक्त आहेत. पंतप्रधान होण्यासाठी अजून कोणते गुण हवेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तसं वाटत असल्यास काही चुकीचं नाही. पण इंडिया आघाडी एकत्र काम करत असल्याने युतीचा चेहरा कोण आहे हे ठरवू," असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.