Sanjay Raut on Radhakrishna Vikhe Patil: भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस युतीचं सरकार असलं तरी भाजपा नेत्यांकडून वारंवार देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आगामी काळात मुख्यमंत्री केलं जाईल का? अशी शंकाही व्यक्त होत आहे. याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हेदेखील उपमुख्यमंत्री होण्यास इच्छुक नव्हते. जाहीर कार्यक्रमात त्यांनी याची कबुलीही दिली आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाव संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं असा टोला त्यांनी लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत सध्या जळगावात असून यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की "मुख्यंत्रीपदावर त्यांना बसवा, कोणी थांबवलं आहे तुम्हाला...जर तुमच्या मनात कोणी वेगळं असेल आणि दुसऱ्यासोबत नांदत असाल तर हा व्य़भिचार आहे. लग्न एकाशी, वरलं एकाला आणि संसार एकाशी यासारखा व्यभिचार नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) गळ्यात जाऊन मंगळसूत्र बांधावं. आम्ही कुठे थांबवलं आहे, आम्हालाही ते चालतील". 


राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?


राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी मतदारसंघातील राहाता येथे प्रकट मुलाखती दरम्यान तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण असं विचारण्यात आलं असता त्यांनी देवेंद्र फडणवीस असं उत्तर दिलं. ते म्हणाले की "देवेंद्र फडणवीस हेच मनातील मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट आहे. सध्या युतीचं सरकार असून एकनाथ शिंदे हे समजतूदार आहे. पण भाजपाच्या वतीने बोलायचं गेल्यास देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत".


दरम्यान यावेळी त्यांना अजित पवारांच्या मनात काय? असं विचारलं असता ते म्हणाले "शरद पवार राज्याला नेहमी संभ्रमित ठेवतात. मात्र आता अजित पवारांना त्यांना सुद्धा संभ्रमित केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय हे कुणाला समजणार?".


गुलाबराव पाटलांवर टीका


जळगावमधील मद्ये गुलाबो गँगच्या भ्रष्टाचाराचा 100 टक्के एन्काऊंटर होणार असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला. जळगाव सुवर्णनगरी आहे, ते काही दिवस आमच्यात सोनं म्हणून वावरत होते मात्र ते कोळसा निघाले असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. आजच्या सभेत त्यांचा भांडा फोड करू असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.


"आम्ही सगळी प्रकरणं बाहेर काढू या भीतीपोटी आम्ही दगड मारु असं ते म्हणत आहेत. पण लोक तुमच्यावरच दगडफेक करतील. हे वेडे झाले असून वेडेच दगड मारतात आणि रस्त्यावर कपडे फाडून फिरत असतात," असा टोला त्यांनी लगावला.