नीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात खास बॅरेक; संजय राऊतांचा खुलासा, म्हणाले `टीव्ही, बाथरुम...`
आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी खास बॅरेक असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनाच्या दिवाळी अंकात `कसाबच्या यार्डात` या सदरात त्यांनी तुरुंगातील अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.
आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी खास बॅरेक असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंय या बॅरेकमध्ये पंचतारांकित सुविधा देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. नीरव मोदीसाठी खास बॅरेक तयार करण्यात आलं असून त्यात टीव्ही आणि बाथरूमसह विविध सेवा देण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या दिवाळी अंकात 'कसाबच्या यार्डात' या सदरात तुरुंगातील अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. तुरुंगात असतांना त्याच्या शेजारच्या बॅरेकमध्ये असल्याने या गोष्टी माहिती झाल्याचं ते म्हणाले आहेत.
ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी अटक केली होती. यानंतर त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. जेलमध्ये आलेले अनुभव संजय राऊत यांनी पुस्तकात लिहिले असून त्याचा काही भाग सामनाच्या दिवाळी अंकातील सदरात प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीला खास बॅरेक असून त्या बॅरेकच्या बाजूला मी होतो, असा दावा केला आहे.
"ही बॅरेक खास बनवून घेण्यात आली होती. याची रोज साफसफाई होत होती. तसेच याचं व्हिडिओ चित्रीकरण देखील केलं जात होतं. लंडनवरून आलेल्या पाहुण्यासाठी ही खास सुविधा असे. हा पाहुणा म्हणजे नीरव मोदी," असं संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "सध्या नीरव मोदी हा लंडन येथील तुरुंगात आहे. त्याने कोर्टाला भारतात तुरुंगात पाठवू नये अशी विनंती केली आहे. भारतीय तुरंग हे खराब आणि अस्वच्छ असल्याचं सांगत त्याने ही विनंती केली आहे. नीरव मोदीच्या म्हणण्यानुसार लंडनच्या कोर्टाने आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून थेट तुरुंग व्यवस्थेचा अहवाल मागवला आहे. यामुळे आता मोदीसाठी निर्माण केलेल्या खास कोठडीचे चित्रण लंडन कोर्टाला पाठवण्यात येत आहे. ही खोली प्रशस्त आहे. तसेच यात बथरूम, टीव्ही रूम देखील ठेवण्यात आली आहे. एका रुगाणाला चांगली सेवा आणि दुसऱ्यांना खराब का?".
आर्थर रोडला बनवलेल्या कोठडीच्या बाजूच्या यार्डात मी असून नीरव मोदी आला तर आपल्याला कंपनी मिळेल असं त्यांना वाटत असल्याचंदेखील राऊत यांनी लिहिलं आहे/
"कसाबचं भूत शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केला"
संजय राऊत यांनी यावेळी तुरुंगातील भ्रष्ट व्यवस्थेवरही भाष्य केलं आहे. सिस्टिम मै भ्रष्टाचार नही, बल्की जेल मै भ्रष्टाचार ही सिस्टिम है, जेलमध्ये कोणत्या दर्जाचे जीवन व्यतीत करावं लागेल हे तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे, असं ते म्हणाले आहेत. "तुम्ही डॉक्टर असा, प्राध्यापक, विचारवंत, संशोधक असा. तुम्ही खरेच गुन्हेगार आहात का नाही, याचा आतल्या व्यवस्थेवर काहीच फरक पडत नाही. ब्रिटीशकालीन जेल मॅन्युअलच्या नावाखाली तुमचं शोषण सुरू होतं," असा आरोप त्यांनी केला आहे.
‘कसाबला इथून पुण्याला नेलं आणि तिथेच फासावर लटकवलं. येरवडा कारागृहात त्याला गाडलं, त्यामुळे त्याचं भूत तेथे असायला हवं, पुण्यातून मुंबईला ते भूत रोज कशाला येईल? कसाबला प्रत्यक्ष पाहणारे अनेकजण येरवड्यात होते, ते कसाबच्या बाबतीत अनेक कथा दंतकथा सांगत, पण त्याच कसाबच्या यार्डात आमचा मुक्काम होता. कसाबचं भूत शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, रात्र जागून काढल्या, पण कसाब कधी दिसला नाही. यार्डामध्ये दिवे कधीच विझत नाहीत, लख्ख प्रकाशात भुते फिरकत नाहीत व आमच्यासारखे लोक सरकारला भुतासारखे वाटत असल्याने कसाबच्या कोठडीत आम्हाला डांबून ठेवले,’ असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.