Bhaskar Jadhav on BJP: ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासंबंधी सूचक विधान केलं आहे. राजकारणात कोणाच्या वाटयाला काय येईल सांगता येत नाही असं ते म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी आपला राजकारणावरील विश्वास उडाला आहे असंही म्हटलं. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी भास्कर जाधव यांची मुलाखत घेतली. भास्कर जाधव यांनी यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी तसंच शिंदे गटातील बंडखोर आमदार यांच्यासह अनेक मुद्द्यांवर परखडपणे भाष्य केलं. 


"राष्ट्रवादी सोडायला नको होती"


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"शिवसेना माझ्या आयुष्यात कधी सोडेन असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण कधीकधी नियतीच्या निर्णयापुढं आपली काही मतं, निर्णय फिके पडतात आणि आपण आत्मसमर्पण करतो. त्यामुळे मला शिवसेना सोडावी लागली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सोडायला नको होता हे मी आजही मान्य करतो. पण माझ्या मते पक्षांतर करणं हे कदापि चांगलं नाही. पण कधीकधी आपण नियतीच्या पुढे हतबल असतो," असं भास्कर जाधव म्हणाले.   


दरम्यान यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं कारण विचारलं असता ते म्हणाले, "त्यासंदर्भात मी कधीही भाष्य केलं नाही. कोणावरही टीका केली नाही. शिवसेना सोडतानाही मी त्यांच्यावरही टीका केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांबद्दलही प्रश्न येत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना तेव्हा माझ्याकडे काही ठोस कारण होतं असं मला आज वाटत नाही. त्यावेळीला काही पक्षांतरर्गत गोष्टी झाल्या असतील. त्या घटना टाळता आल्या असत्या. त्यांनी त्या टाळल्या नाहीत आणि मीदेखील तडकाफडकी निर्णय घेतला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचं माझ्याकडे कोणतंही सबळ कारण नाही".


भाजपात प्रवेश करणार का?


भास्कर जाधव यांना भाजपात प्रवेश करणार का? असं विचारलं असता ते म्हणाले "मी जे काम करेन ते उजळ माथ्याने आणि उघड भूमिका घेत करेन. भाजपा माझं घर जाळण्यापर्यंत पोहोचली होती. पण मी घाबरलेलो नाही. त्यामुळे भाजपात जाण्याची कधी चर्चा किंवा संबंधच आलेला नाही". 


भाजपाकडून ऑफर आली तर काय? असं विचारलं असता ते म्हणाले "भाजपाची ऑफर आली तरी मी जाणार नाही, पण मी नाकाला जीभ लावत नाहीत. ज्या दिवशी शिवसेना सोडण्याची वेळ आली तेव्हापासून मी व्यथित आहे. राजकारणात कोणाच्या वाटयाला काय येईल सांगता येत नाही. मी कधी शिवसेना सोडेन असं वाटलं नव्हतं. त्यामुळे मी राजकारणात असलो तरी राजकारणावरील विश्वास उडाला आहे. जर ती भाजपा अडवाणी, वाजपेयी यांची असती तर गेलो असतो. पण तत्वज्ञान सांगणाऱ्या भाजपाने राजकारणाचा स्तर ओलांडला असून, महाराष्ट्राचा सुसंकृतपणा मातीत घालवला आहे. त्याची मला भयंकर चीड आहे," असं सांगत भास्कर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.