`...तर मग श्रीमंत व्यक्ती पंतप्रधान होतील`, उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले `शिंदे गटाचा दावा नीचपणाचा आणि विकृत`
Uddhav Thackeray Press Conference: उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात दाखल प्रकरणांचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंनी अपात्रतेचा मुद्दा आधी निकाली काढला पाहिजे अशी मागणी केली आहे.
Uddhav Thackeray Press Conference: जर पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर उद्या जगातील कोणतीही श्रीमंत व्यक्ती आमदार, खासदार फोडून पंतप्रधान होऊ शकते. त्या पक्षाला काही अर्थ नाही, त्याला गद्दार म्हणतात अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर (Matoshree) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) अपात्रतेचा (Disqualification) निर्णय आधी झाला पाहिजे अशी मागणी केली आहे.
"गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून शिवसेनेचं काय होणार? धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही?तसंच गद्दारी करुन टेंभा मिरवणार अशी चर्चा सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे दोन्ही प्रकरणं प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. शेवटी निवडणूक आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपलं म्हणणं लिखित स्वरुपात मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे," अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. मी दुसरी शिवसेना (Eknath Shinde Faction) मानत नाही. शिवसेना एकच असेल आणि एकच राहणार असंही यावेळी ते म्हणाले.
"सोबत असणारे हजारो शिवसैनिक, जनता यांना काय होणार याची उत्सुकता आहे. जर पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर जगातील कोणतीही श्रीमंत व्यक्ती आमदार (MLA), खासदार (MP) फोडून पंतप्रधान होऊ शकते. त्या पक्षाला काही अर्थ नाही. त्याला गद्दार म्हणतात," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
"शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे घटना बनवली आहे. त्याप्रमाणे निवडणुका होतात. यावेळची निवडणूक २३ जानेवारीला होणं अपेक्षित होतं. आम्ही निवडणूक आयोगाकडे (Election Commission) मागणी केली आहे. आम्हाला परवानगी द्या, अन्यथा आहे तसं सुरु ठेवावं असं म्हटलं आहे. आयोगाने परवानगी दिल्यानंतर रितसर निवडणूक होईल," अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
"शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्या गद्दारांनी शिवेसेची घटनाच मान्य नाही असं म्हटलं आहे. विभागप्रमुख पद हे केवळ मुंबई किंवा मोठ्या शहरांपुरतं आहे. आम्ही निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सर्व पूर्तता केल्या आहेत. विभागप्रमुखांची प्रतिज्ञापत्रं, सदस्यसंख्या दाखवण्यासाठी अर्ज भरुन घेतले आहेत. ते लाखाच्या संख्येत आहेत. पण आता जर निवडून आलेले आमदार, खासदार म्हणजेच पक्ष आहे आणि त्या आधारे निर्णय द्या मागणी असेल तर हास्यास्पद आहे. तसं असेल तर निवडणूक आयोगाने थांबण्याची गरज नव्हती," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"गावोगावी, खेड्यात जाऊन आम्ही अर्ज भरुन घेतले आहेत. हे सर्व पाहून त्यांच्या तोंडचं पाणी पळालं असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 20 जूनला पक्षादेश मोडून विधान परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी केली आणि पळून गेले होते. त्यांनी पक्षावर दावा करणं नीचपणाचं आणि विकृत कृत्य आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
"अपात्रतेचा निर्णय आधी झाला पाहिजे. ते जर अपात्र होणार असतील किंवा अपात्र होण्यास लायक असतील तर मग हा दावा निवडणूक आयोग कसं काय गृहित धरु शकतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही त्याआधी हा निकाल लागू नये असं आमचं मत आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आधी लागला पाहिजे," अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.