Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टिका केली. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालपर्यंत जागावाटपामध्ये हिरिरीने भाग घेत होते. त्यांना आता राज्यसभेची जागा देणार आहेत. प्रत्येकजण आपल्याकडे बघतंय पण मग शेतकऱ्याकडे कोण बघणार? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1 लाख देऊन काम होत नाही. त्यांचं कुटुंब उघड्यावर पडत. त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न त्यांनी विचारला.अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर 10 दिवसात ते तिकडे गेले. अशोक चव्हाणांवरदेखील आदर्श घोटाळ्याचे आरोप करुन नेण्यात आल्याचे ते म्हणाले. 


शिवसेना कोणाची?


पोलीस बाजुला ठेवा. जनतेला समोर ठेवा. त्यांनी माझ्यासमोर यावं आणि शिवसेना कोणाची? हे एकनाथ शिंदेंनी सांगाव, असे आवाहन त्यांनी केलं. 


मतांचा बाजार मांडला आहात आणि अबकी पार 400 पार चा नारा दिलात, हे सर्व भाडोत्री आहेत. तुमची सत्ता गेल्यावर हे निघून जातील असे ते पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणाले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे करुन दाखवत असेल तर विश्वगुरुंनी हे देशात करुन दाखवावे, असेही ते म्हणाले.


राऊतांनी व्यक्त केली चिंता 


अशोक चव्हाणांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरु केली. यानंतर संजय राऊतांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण भाजपवासी झाले आहेत हे पाहून विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. अशोक चव्हाण कालपर्यंत सोबत होते. महाविकास आघाडीसोबत चर्चा करीत होते. पण आज ते गेल्याचे ट्विट राऊतांनी केले आहे. 


कॉंग्रेसवर दावा सांगणार?


एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडल्यावर शिवसेनेवर दावा केला. अजित पवारांनी बाहेर पडून राष्ट्रवादीवर दावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे अशोक चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय. आपल्या देशात काहीही घडू शकते! असेही ते पुढे म्हणाले. 


ऑपरेशन लोटस 


राज्यात सध्या ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु आहे. 15 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र मध्ये येत आहेत. त्यावेळी कॉग्रेस माजी मंत्री आमदार  अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू असून अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती समोर येत आहे. अशोक चव्हाणांसोबत असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणी सुरू आहे. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.