Uddhav Thackeray in Thane: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)गुरुवारी (26 जानेवारी) ठाण्यात (Thane) जाणार आहेत. दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बालेकिल्ल्यात येणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे ठाण्यात गेल्यास शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर हा त्यांचा पहिलाच दौरा असेल. दरम्यान या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे गट शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तसंच ठाकरे गट आणि शिंदे गटाचे समर्थक आमने-सामने येणार असल्याने तणाव निर्माण होण्याचीही शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 जानेवारीला आनंद दिघे यांची जयंती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पाहिलीच जयंती असल्याने शिंदे गटासाठी हा दिवस महत्वपूर्ण असणार आहे. मात्र हीच संधी साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा ठाणे दौरा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे हे प्रथमच ठाण्यात येणार आहेत. 


उद्धव ठाकरे ठाण्यात इतर कार्यक्रमाबरोबरच टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी दिघे यांचा पुतळा आहे, अगदी त्याच्या बाजूलाच आनंदमठ (आश्रम) असून सध्या शिंदे गटाने त्याच्यावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार याकडे ठाणेकरांसह संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.


शिंदेंच्या बंडामुळे राज्यात सत्तांतर


एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात बंड पुकारल्यानंतर राज्यात मोठं राजकीय वादळ आलं. एकनाथ शिंदेंनी आमदारांना घेऊन आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठली होती. यादरम्यान महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अखेर या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरेंनी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यात काही अर्थ नाही सांगत ही घोषणा केली होती. 


यानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडल्या आणि 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात फडणवीस-शिंदे सरकार आलं. तेव्हापासून राज्यात ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. खरी शिवसेना कोण आणि पक्षचिन्ह कोणाचं याबाबत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु असून अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही.