अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही झपाट्याने वाढत असतानाच आता अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील 45 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. अमरावती विद्यापीठात मागील आठवड्यात तीन दिवस कर्मचार्‍यांची सामूहिक कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता त्याचा अहवाल समोर आला आहे. यात विद्यापीठातील तब्बल 45 कर्मचारी तर त्यांच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही असे एकूण 59 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील आठवड्यात झालेल्या कोरोना चाचणीत विद्यापीठातील एकंदरीत 289 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. विद्यापीठात 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 289 कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या नमुन्यांची तपासणी झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पूजा इंगळे निकिता लोणारे यांनी नमुने घेतले होते. विद्यापीठातील प्रयोगशाळेने 59 पॉझिटिव्ह अहवालावर शिक्कामोर्तब केला आहे.


विद्यापीठातील 245 कर्मचारी-अधिकारी अजूनही कोरोना चाचणीपासून अद्यापही वंचित आहे. पुन्हा याच आठवड्यात वैद्यकीय अधिकारी स्मिता थोरात यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या रूग्णालयात कर्मचार्‍यांची सामूहिक कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी पासून वंचित कर्मचाऱ्यांनी शिबिरात तपासणी करून घ्यावी असे आवाहन कुलसचिव तुषार देशमुख यांनी केले आहे.


सोमवारी आढळले 699 कोरोनाचे नवे रुग्ण;10 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू


अमरावती जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. काल सोमवारी अमरावतीत तब्बल 699 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 10 रुग्णांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ही 35816 वर पोहचली आहे तर मृतांचा आकडा हा 521 वर पोहचला आहे. आजपर्यंत अमरावती जिल्ह्यातील 29531 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 5764 रुग्णांवर उपचार सुरू आहे.


केंद्रीय पथकाकडून शहराची पाहणी; कंटेनमेंट झोनमध्ये घरोघर तपासणी करण्याचे आदेश


कोरोनाबाधितांचे आधिक्य असलेल्या परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करून तेथे घरोघर तपासणी मोहिम राबविण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने सोमवारी दिले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने अमरावती विभागातील कोरोना वाढीची कारणे जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाकडून केंद्रिय सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी, तज्ज्ञ डॉ. आशिष रंजन यांची टीम नियुक्त करण्यात आली. या टीममधील सहसचिव श्री. विनायक यांनी अमरावती शहराला भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाशी चर्चा केली.


अमरावतीतील सर्व शासकीय कार्यालयात "नो मार्क्स नो एन्ट्री"


अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या 8 मार्च पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. अशातच लोकांनी मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवा व सॅनिटाईझर वापर करावा असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. लॉक डाऊन मध्ये शासकीय कार्यलये हे सध्या सुरू आहे. जर तुम्ही एखादा कामासाठी शासकीय कार्यलयात गेले आणि तुमच्या तोंडाला मास्क नसला तर तुमची आता चांगलीच फजीती होणार आहे.कारण आता तुम्ही मास्क बांधला नाही तर तुमचा फोटो काढून हा अधिकाऱ्यांना पाठवला जाणार आहे. कारण कोरोनाला थांबवन्यासाठी जिल्हा सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये नो मार्क्स नो एंट्रीच्या मोहिमेची कडक अंबलबजावणी सुरू केली आहे. तसे फलक सध्या शासकीय कार्यलयात व बाहेर लावण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जर शासकीय कार्यलयात जात असाल तर तुम्हाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.