अंधश्रद्धेमुळे ८ महिन्याच्या गरोदर महिलेचा मृत्यू
मावळमधील शिलिंब गावातील घटना
पुणे : महाराष्ट्रात अंधश्रद्धेमुळे आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत. याच अंधश्रद्धेमुळे पुण्यातील मावळमध्ये एका २१ वर्षीय गरोदर महिलेचा बळी गेला आहे. (Shocking! 8 month pregnant women died due to Black Magic ) दिपाली बिडकर असे या महिलेचं नाव असून एप्रिल महिन्यात तिचा विवाह महेश बिडकर याच्याबरोबर झाला होता. याप्रकरणी दीपालीचा भाऊ संतोष मगर याने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एप्रिल महिन्यात दीपालीचा विवाह महेश बरोबर झाला होता. त्यानंतर दीपालीचा पती महेश बिडकर, सासू जिजाबाई बिडकर, सासरा रघुनाथ बिडकर, दिर मोहन बिडकर, जाव बकुळा बिडकर यांनी माहेराहून पैसे आणि विविध वस्तू आणण्याचा तगादा लावला होता. यामुळे दिपालीला पती देखील वारंवार मारहाण करत होता. ही बाब दीपालीने आईला सांगितली मात्र नंतर देऊ असे सांगून तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आले.
सासरी गेल्यानंतर ८ महिन्याच्या गरोदर दीपालीला अचानक त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी सासरच्या लोकांनी मांत्रिकाला बोलावले. बाहेरची बाधा झाली असल्याचे सांगून दीपालीला सासरच्या लोकांनी दवाखान्यात घेऊन जाण्यास नकार दिला. त्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दीपालीच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने पुन्हा मांत्रिकाला बोलविण्यात आले.
त्यावेळी लिंबू उतरवून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र तरी देखील दीपाली शुद्धीवर न आल्याने तिला उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आले. तोपर्यंत दीपाली व तिच्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या विळख्यात येऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागत असल्याने सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे.