अरूण मेहत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील सुखसागर नगर परिसरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. गुरूवारी रात्री घडलेली ही घटना आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३३ वर्षीय अतुल शिंदे, ३० वर्षीय जया अतुल शिंदे, ६ वर्षीय ऋग्वेज अतुल शिंदे आणि ३ वर्षीय अंतरा अतुल शिंदे असं मृत पावलेल्या कुटुंबियांची नावे आहेत. अतुल शिंदे हे शशिकांत चिव यांच्या घरी भाड्याने राहत होते. या संपूर्ण कुटुंबियांचे मृतदेह राहत्या घरातील सीलिंग पंख्याला हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनेचा तपास घेत आहेत. 


आर्थिक अडचणीमुळे संपूर्ण कुटूंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संपूर्ण घटनेचा तपास पोलीस घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे कुटुंबीयांनी घर उघडलं नव्हतं. त्यांचा कुणात वावरही नव्हता आणि काहीही हालचाली दिसून येत नव्हत्या. शिवाय या कुटुंबातील कुणीही फोन उचलत नव्हते आणि व्हॉट्सअॅपलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे संशय आल्याने शेजाऱ्यांनी गुरूवारी रात्री पोलिसांना फोन करून संपू्र्ण माहिती दिली. 



भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिंदे कुटुंबीयांना बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नसल्याने पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश करताच त्यांना समोरच या चौघांचेही लटकलेले मृतदेह दिसले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पंचनामा केला असून आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे.