आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या (Chandrapur) वरोरा शहरात स्वतःच्या दोन चिमुकल्यांना विष देत पित्याने विषप्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. मुलाना संपविणाऱ्या पित्याचा मृतदेह वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शेत शिवारात आढळला. पोलिसांना तपासादरम्यान आढळलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या बोर्डा गावात संजय कांबळे आपल्या कुटुंबासोबत रहात होते.  संजय कांबळे, त्यांची पत्नी, 6 वर्षीय मुलगा आणि 3 वर्षांची मुलगी असं हे कुटुंब. यातील पिता संजय कांबळे घरीच खाजगी शिकवणी वर्ग घेत होता. तर पत्नी एका महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे. 


कोरोनाआधी संजय कांबळे यांचे शिकवणी वर्ग उत्तम चालत असत. मात्र कोरोनानंतर शिकवणी वर्गात मुलांची संख्या रोडावल्याने कुटुंबाचा गाडा चालविणे अशक्य झाला होता. संजय कांबळे याने अनेकदा याबाबत निराशा व्यक्त केली होती. मला ही मुले पोसता येत नसतील तर त्यांचा जीव घ्यावा लागेल असंही त्यानी जवळच्या व्यक्तींजवळ बोलून दाखविलं होतं.


शुक्रवारी घरात कुणीही नसताना संजय कांबळेने आपल्या दोनही मुलांना विष देऊन त्याची हत्या केली. त्यानतंर घराला कुलूप लावत संजय कांबळे फरार झाला. कामावरून घरी परतलेल्या कांबळे यांच्या पत्नीला हा सारा प्रकार कळताच तिने आरडाओरड करुन शेजाऱ्यांच्या मदतीने मुलांना रुग्णालयात नेले खरे मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.


हे प्रकरण पोलिसात दाखल होताच यातील गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी त्यांना वर्धा जिल्ह्यातल्या गिरड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साखरा शेतशिवारात एक मृतदेह आढळल्याची बातमी मिळाली. हा मृतदेह संजय कांबळे याचाच असल्याची पुष्टी झाली. स्वतः विषप्राशन करत संजय कांबळे यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी आता याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.


बेताची आर्थिक स्थिती, कोरोना काळानंतर बिघडलेले कौटुंबिक बजेट आणि महागाईचा विस्फोट यामध्ये चौकोनी कुटुंब चालविणे अवघड झाल्याची स्थिती या घटनेने स्पष्ट केली आहे. अशा स्थितीत  समुपदेशन आवश्यक असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.