अमर काणे, झी मीडीया, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी इथल्या बाजार चौक परिसरात दोन चिमुकल्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. 6 वर्षांची साक्षी फुलसिंग मीना आणि 3 वर्षांची राधिका फुलसिंग मीना या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साक्षी आणि राधिकाची आई माधुरी फुलसिंग मीना या राजस्थान इथल्या बारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे पती फुलसिंग हे राजस्थानमध्ये शेती करतात. माधुरी फुलसिंग यांचं माहेर पाटणसावंगी इथे आहे. फुलसिंग आणि माधुरी यांना तीन मुली आहेत. साक्षी आणि राधिकासह पूनम ही मोठी मुलगी.


माधुरी यांच्या वडिलांचं निधन झाल्याने त्या तिन्ही मुलींना घेऊन पाटणसावंगी इथं आपल्या माहेरी आल्या होत्या. सोमवारी रात्री सर्वांनी जेवण केलं. पण मंगळवारी सकाळी साक्षी आणि राधिकाची प्रकृती अचानक खालवली. दोघीनांही स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. पण उपचारापूर्वीच 3 वर्षांच्या राधिकाचा मृत्यू झाला होता. 


तर सहा वर्षांच्या साक्षीवर प्रथमोपचार करुन तिला नागपूरमधल्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. पण वाटेतच साक्षीचाही मृत्यू झाला. 


दोघींना जेवणातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सगळ्यांनी जेवण केलं असताना त्या दोघींनाच विषबाधा कशी झाली याबाबत पोलीस तपास करत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दोन चिमुकलींच्या मृत्यूच्या घटनांमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे.