प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदूरबार : एका पिडीतेच्या मृतदेहाची अवहेलना आणि मृत मुलीला न्याय मिळवण्यासाठी बापाचा संघर्ष याची अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेची नंदुरबार जिल्ह्यात चर्चा आहे. मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 42 दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मृत मुलीला न्याय मिळावा यासाठी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरून ठेवला आहे. मुलीवर अत्याचार करुन नराधमांनी तीचा खुण केल्याचा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी केवळ आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला, तसंच शवविच्छेदन अहवालातही अत्याचारांबाबत तपासणी करण्यात आली नाही असा आरोपही मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. याविरोधात ग्रामस्थांच्या मदतीने मृत मुलीच्या वडिलांनी व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवाहित मुलीवर बळजबरी 
सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील धडगाव तालुक्यातील खडक्या गावातील हे कुटुंब रहातं. गावातील रणजीत ठाकरे आणि आणखी एकाने कुटुंबातील विवाहीत मुलीला 1 ऑगस्टला बळजबरीने गाडीवर बसवून गावाबाहेर नेलं. त्यानंतर मुलीने कुटुंबियांना फोन करुन आपल्याबरोबर घडलेल्या घटनांची माहिती दिली. रणजीत आणि इतर काहीजणांनी आपल्यावर बळजबरी केली असून ते मला मारुन टाकतील असं त्या मुलीने सांगितलं.


मुलीने आत्महत्या केल्याचा निनावी फोन
पण काही वेळातच तिच्या कुटुंबियांना एका निनावी फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने तुमच्या मुलीने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचं सांगितलं. पीडित मुलीचं कुटुंब घटनास्थळी पोहोचण्याआधीच काही लोकांनी तिचा मृतदेह झाडावरुन खाली उतरवत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, तसंच तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. 


पोलिसांनी केली आत्महत्येच्या गुन्ह्याची नोंद
शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलीसांनी या घटनेची आत्महत्येचा गुन्हा म्हणून नोद करुन घेतली. मात्र जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय मृत मुलीच्या वडिलांनी घेतला असून घरा शेजारच्या शेतात खड्डा करुन त्यात मीठ टाकून मुलीचा मृतदेह पुरण्यात आला आहे. पोलिसांनी आपल्या मुलीचा मृतदेहून पुन्हा उकरून, शवविच्छेदन करावं आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांची आणि ग्रामस्थांची आहे. पुन्हा शवविच्छेदनासाठी त्यांनी हा मृतदेह गेल्या 42 दिवसापासून सांभाळून ठेवला आहे.


या 42 दिवसात मृत मुलीच्या वडीलांसह ग्रामस्थांनी धडगाव पोलीस स्टेशनसह थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठुन आपल गाऱ्हाणे मांडलं आहे. तर ठाणे इथल्या सामाजीक कार्यकर्त्या परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास ही घटना आणुन दिली आहे. पोलीसांनी याबाबत बोलतांना तपासाच्या अनुशंगाने जे तथ्य समोर आले त्यानुसार अतिरीक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केलं. दरम्यान, पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात पुर्नशवविच्छेदन करण्याच्या सुचना धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहेत.